पुणे : राज्यात येत्या काही दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असूनही उकाळा अधिकच जाणवत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून पारा 40 अंशावर चढला आहे.
पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज आणि उद्या शहरात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याकडून शहरासह पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच दुपारच्या सुमारास शहरातील तापमानात मोठी वाढ होणार आहे. पुण्यात आज तापमान 38 अंश सेल्सिअस गेले असून शहराचे तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
विदर्भात तापमान वाढ
एप्रिल महिन्यांच्या सुरुवातीपासून विदर्भातील तापमान वाढले आहे. मागील सहा दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान सतत वाढत आहे. सलग सहाव्या दिवशीसुद्धा चंद्रपूरच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. 12 एप्रिल रोजी 42.2, 13 एप्रिल रोजी 43.2, 14 एप्रिलला 42.8 तर, 17 एप्रिलचे तापमानही उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
‘या’ शहरात सर्वाधिक तापमान
भुसावळात 13 एप्रिलनंतर सोमवारी पाचव्या दिवशी कमाल तापमान पुन्हा 43.3 अंश नोंदवले गेले. शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात ही नोंद झाली. दरम्यान, पश्चिमी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे एप्रिलच्या उर्वरित 13 दिवस तापमानाचा 42 ते 47 अंशांदरम्यान राहील. प्रामुख्याने 29 एप्रिल रोजी ते उच्चांकी 47 अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.