मुंबई: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना आहेत ज्या दरवर्षी घडतात. या वर्षी, 2023 मधील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. 100 वर्षांनंतर होणारे हे सूर्यग्रहण अतिशय खास मानले जात असून याला हायब्रीड सूर्यग्रहण म्हटले जात आहे. आजवर तुम्ही सूर्यग्रहणाचे अनेक प्रकार ऐकले असतील, परंतु ‘हायब्रीड’ ग्रहण पहिल्यांदाच ऐकत असाल. हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजे काय ते जाणून घेऊया.
खग्रास आणि खंडग्रास अशा दोन्ही प्रकारात दिसणारे हायब्रीड सूर्यग्रहण येत्या 20 एप्रिल रोजी होत आहे. वर्षातील पहिले व अतिशय दुर्लभ असे हे सूर्यग्रहण भारतातून मात्र दिसणार नाही; पण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा आनंद घेता येईल. सूर्यग्रहण दिसणार नसले तरी खगोलप्रेमींना 22 व 23 रोजी लायरिड उल्कावर्षाव पाहण्याची संधी मात्र मिळणार आहे.
सूर्यग्रहण कुठून दिसणार
20 रोजीचे सूर्यग्रहण दक्षिण पॅसिफिक महासागरातून दिसेल. कंकणाकृती ग्रहणाला तिथूनच सुरुवात होईल. पुढे पाश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी, पापुआंगिनी, इंडोनेशियाची दक्षिण बेटे येथून मात्र खग्रास ग्रहण दिसेल. उर्वरित इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स या पूर्व आशियातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. ग्रहणाच्या सुरुवातीला आणि शेवटी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल तर मध्य काळात हे ग्रहण खग्रास दिसेल. एकाच वेळेस कंकणाकृती आणि खग्रास ग्रहण दिसत असल्यामुळे याला हायब्रीड सूर्यग्रहण असे म्हणतात.
पाच तास चालणार ग्रहण
पृथ्वीच्या गोल आकारामुळे आणि कमी-अधिक उंची/अंतरामुळे एकाच दिवशी कुठे कंकणाकृती तर कुठे खग्रास सूर्यग्रहण पाहावयास मिळते. दशकातून एखाद्या वेळेसच असे दुर्मीळ हायब्रीड सूर्यग्रहण होत असते आणि शतकात ही शक्यता केवळ 3 टक्के असते. हे सूर्यग्रहण अश्विनी नक्षत्रात आणि मेष राशीत घडणार आहे. संपूर्ण ग्रहण 5 तास 24 मिनिटांचे असेल.