नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण ब्यूरने ऑक्सफॅम इंडिया आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध भारताच्या विदेशी निधी नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
ऑक्सफॅम इंडियाने 2019-20 मध्ये 12.71 लाख रुपयांच्या व्यवहारात FCRA चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तसेच 2013 ते 2016 या कालावधीत ऑक्सफॅम इंडियाने 1.5 कोटी रुपयांच्या विदेशी व्यवहारांमध्येही अनियमितता केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ऑक्सफॅम इंडियाला 2013 ते 2016 दरम्यान नेमलेल्या बँक खात्याऐवजी थेट त्याच्या फॉरेन कंट्रिब्युशन युटिलायझेशन खात्यात सुमारे 1.5 कोटी रुपये मिळाले. ऑक्सफॅम इंडियाने सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चला (सीपीआर) 12.71 लाख रुपये दिल्याचा आरोपही एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. त्यांनी 2019-20 या आर्थिक वर्षात विदेशी योगदान (नियमन) कायदा (FCRA) 2010 च्या नियमांचे उल्लंघन करून व्यवहार केले.
गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून कारवाई
गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ऑक्सफॅम इंडियाचा एफसीआरए परवाना निलंबित करण्यात आला होता. गृह मंत्रालयाने ऑक्सफॅम इंडियावर “देशविरोधी” क्रियाकलापांमध्ये गुंतल्याचा आणि FCRA नूतनीकरणासाठी भारत सरकारवर दबाव आणण्यासाठी इतर देशांच्या सरकार आणि संस्थांद्वारे दबाव आणल्याचा आरोप केला.