मुंबई: संजय राऊतांनी चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेत घुसणार आहे, असं थेट आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यावर आता संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. “घुसा घुसा. तुम्ही आम्ही वाट बघत आहोत. घुसा आणि परत जाऊन दाखवा” असं प्रतिआव्हान राऊतांनी गुलाबराव पाटलांना दिलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगाव जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होणार आहे. माजी आमदार स्वर्गीय आर.ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंचं स्वागतच आहे, परंतु, संजय राऊतांनी या सभेत चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेत घुसणार आहे, असं थेट आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यावरून संजय राऊतांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील
“आर.ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर.ओ. पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असतील, तर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारख माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी एसपींना पत्र देणार आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार आहे,” असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.