मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. असे असताना मृत झालेल्या श्रीसदस्यांचा शवविच्छेदन अहवाल आता प्राप्त झाला असून, यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत झालेल्या 14 पैकी 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्ले नव्हते. उर्वरीत मृतांनी मृत्यूपूर्वी काही खाल्ले होते किंवा नाही याबद्दल पुरेशी माहिती पुढे आली नाही. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवी मुंबईच्या खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचा तडाखा बसल्याने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे अनेकजण अत्यवस्थ झाले. त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्माघातामुळे 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. या मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. या अहवालानुसार मृत्यूमुखी पडलेल्या 14 पैकी 12 जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं समोर आलं आहे. अर्थात, मृत्यूपूर्वी किमान 6 ते 7 तास त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. इतर दोघांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काही खाल्लं होतं किंवा नाही यासंदर्भात स्पष्टता येऊ शकलेली नाही. शिवाय, त्यांनी पाणीही अत्यंत कमी किंवा अजिबात न प्यायल्याचंही अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यातल्या काहींना पूर्वव्याधीही होत्या, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भाजपचे नेते आता गप्प का?
यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात हे श्रीसेवक पाण्यावाचून तडफडून मेले, असे संजय राऊत यांनी म्हटले. राज्य सरकारकडून मृतांचा खरा आकडा लपवला जात आहे. माझ्या माहितीनुसार खारघर दुर्घटनेतील मृतांचा किमान आकडा 50 आणि कमाल आकडा 75 इतका आहे. पालघरमधील साधूंच्या हत्याकांडावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते चार दिवस डहाणूमध्ये ठाण मांडून बसले होते. तेच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते 50 श्री सेवकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना भेटायला गेले नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात श्री सेवकांविषयी सहानुभूती दिसली नाही. खोके सरकारचे लोक मृत श्री सेवकांच्या घरी जाऊन त्यांना पैसे देऊन गप्प बसायला सांगत आहेत, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.