जळगाव: गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना सभेत चौकटीत राहून बोलण्याचा इशारा दिला. अन्यथा सभेत घुसण्याचे सांगितले. यावरुन आता राजकारण तापले असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी गुलाबराव पाटलांना थेट आव्हानच दिले आहे. सभेत घुसण्यापुर्वी आधी आपल्या घरी सांगून या असा पलटवार कोळी यांनी केला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर पलटवार करताना शरद कोळी म्हणाले की, उध्दव ठाकरेंची विराट सभा पाचोरा येथे होणार आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना चौकटीत राहून बोलण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला चौकटीत राहून बोला सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही काय आम्हाला अक्कल शिकवणार तुम्ही तर ५० खोक्यांमध्ये चौकट विकून गुवाहाटील जावून सर्व सत्यानाश केला. आणि तुम्ही आम्हाला काय शहाणपण शिकवणार. आम्ही कसं बोलाव हे आम्हाला चांगल माहिती आहे. आम्ही कसं बोलाव हे शिकविण्याची आम्हाला गरज नाही. आधी तुम्ही तुमचं बघा, हिंमत असेल तर तुम्ही सभेत घुसूनच दाखवा, सभेतून तुम्ही माघारी जाणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून तुमच्या घरच्यांना आधी सांगूनच सभेत या असा पलटवार शरद कोळी यांनी केला आहे.
एकनाथ खडसेंची सडकून टीका
मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेत चौकटीत राहून बोलावं अन्यथा सभेत घुसू अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यावरून आता एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. जे गुलाबराव पाटील खासदार संजय राऊत यांना चौकटीत राहून बोलण्याचा सल्ला देतात, ते गुलाबराव पाटील चौकटीत राहून कधी बोलले आहेत असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र आरोप करणारी व्यक्ती कोण आहे त्यावरही त्या आरोपांचे गांभीर्य टिकून असते असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
आधी स्वत:पासून सुरुवात करावी
राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेच्या नेत्यांची भाषा पाहिल्यानंतर कोणालाही लक्षात येईल की कोणता नेता चौकटीत राहून बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ज्यांनी हा सल्ला दिला आहे त्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी आधी हे सांगावं की ते कधी चौकटीत राहून बोलले आहेत का असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. आज संजय राऊत यांच्या टीकेवरून जरी आरोप केले जात असले तरी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे चौकटीच्या बाहेर राहून अनेकदा बोलले आहेत असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची चौकटीत राहून बोलावं ही अपेक्षा ठीक आहे मात्र त्याची सुरुवात स्वतः पासून केली तर अधिक संयुक्त होईल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.