पुणे : पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी देश विदेशातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येतात. मात्र याचा गैरफायदा घेत फसवणुकीचे प्रकार याठिकाणी वाढले आहेत. पुण्यात कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन एज्युकेशन घोटाळा उघड झाला आहे. यात शेकडो युवकांची फसवणूक झाली आहे.
पुण्यात कोट्यवधी रुपयांचा ऑनलाईन एज्युकेशन घोटाळा उघडकीस आला आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गिकलर्न, राईट प्लेस फॉर टेक्नॉलॉजी लर्निग या संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शैक्षणिक कर्जाच्या नावाखाली अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. शैक्षणिक कर्ज देऊन त्यांचे हप्त्याच्या रकमेएवढी स्कॉलरशीप म्हणून देणार असल्याचे सांगून अनेक विद्यार्थ्यांना गिकलर्न, राईट प्लेस फॉर टेक्नॉलॉजी लर्निग कोर्समध्ये प्रवेश देण्यात आला. युवकांनी एज्युकेशन लोन स्वतःच्या नावावर घेतले. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर शिष्यवृत्तीची कोणतीही रक्कम मिळाली नाही. शेकडो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांमध्ये अशी फसवणूक झाल्यामुळे हा एकूण घोटाळा कोट्यवधींमध्ये जाणार आहे.
कर्जाच्या हप्त्यांसाठी तरुणांकडे तगादा
पुण्यातील जवळपास 100 हून अधिक तरुणांच्या नावावर अशा प्रकारे दोन ते अडीच लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेण्यात आले. आता या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपनीन्यांनी तरुणांना तगादा लावला. ही संस्था नेमकी कुठे आहे कोण चालवत आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.