जळगाव : पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेत खासदार संजय राऊत चौकट सोडून बोलले तर सभेत घुसणार असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होती. मात्र आता त्यांनी आपल्या विधानावरुन पटली मारली आहे. मी सभेत घुसणार नाही. मला काय गरज, सैनिक पहिले जातात, सरदार नंतर जातो हे शिवसेनेतच शिकलो असल्याचे मंत्री पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
पाचोरा येथे माजी आमदार (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या पुतळा अनावरणासाठी उध्दव ठाकरे येत आहेत. यानंतर तेथेच ठाकरे गटाची विराट सभा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातारवण तापले आहे. मंत्री पाटील यांच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिआव्हान दिले. जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी तर मंत्री पाटील सभेत घुसल्यास 51 हजार रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले. युवासेना विस्तारक शरद कोळी यांनी आम्हाला चौकटीत बोला म्हणून शिकवणार का? तुम्ही 50 खोके घेऊन गुवाहटीला जावून त्या चौकटीचा सत्यनाश केला. तुमच्यात दम असेल तर सभेत घुसूनच दाखवा,सभेतून परत येणार नाही याची खबरदारी तुमच्या कार्यकर्त्यांना आणि घरच्यांना सांगून या, असा इशारा दिला आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मंत्री पाटील म्हणाले, उध्दव ठाकरे यांना निश्चितपणाने आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. ज्यांनी शिवसेना फोडली. पक्षाचा सत्यनाश केला. ज्यांनी आमचे 41 मते घेतली त्यांनी टीका चौकटीत करावी. चौकटीत टीका न केल्यास कोण सहन करणार आहे. त्यांनी ठाकरेंना आणि शिवसेनेला फसवले त्यांची घाण ऐकणे उचित नाही. दु:ख होत आहे. कार्यकर्त्यांना बलिदानावर उभ्या राहिलेल्या भगव्याला लाथाडले. त्यात सर्वात मोठा हात राऊतांचा आहे. गुलाबराव पाटील चार अक्षरांवर उभे आहेत. आमची मते घेऊन बाहेरच्या दरवाजाने आत आले. ते आम्हाला शिवसेनेची अक्कल शिकवताहेत ? असा सवालही त्यांनी विचारला.