पुणे : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याप्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. घटनास्थळाचे समोर आलेले व्हिडीओ आणि फोटो अतिशय भयानक आहेत. ही दुर्घटना घडत असताना काही लोक चांदीच्या ताटात जेवताना दिसत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना अजित पवारांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, खारघरमध्ये जे घडलं त्याची जबाबदारी सरकारची आहे. कारण सरकारने कार्यक्रम घेतला होता. खारघर दुर्घटनेत किती मृत्यूमुखी पडले याबाबतच्या आकड्यात तफावत आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. तशी मागणी मी राज्यपालांकडे केली आहे. काहीजण आकडा सांगून मोकळे झाले आहेत. मला आकडा सांगायचा नाही. पण या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
लोक मरत असताना चांदीच्या ताटात जेवण
या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही व्हिडीओ भयानक आहे. काही व्हिडीओ आणि फोटो भयानक आहेत. तर काही फोटोत चांदीच्या ताटात जेवताना दिसत आहे. याला आयएएस अधिकारी जबाबदार आहेत का? कोणाच्या हट्टासाठी हे केलं गेलं? आम्ही माहितीच्या अधिकारात महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी किती खर्च झाला याची आम्ही माहिती मागवली आहे. आतापर्यंतच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील सगळ्यात जास्त खर्च या कार्यक्रमात झाल्याते त्यांनी सांगितले.