जळगाव : भोसरी प्रकरणात कुठलंही तथ्य नाही, केवळ मी भाजपातून राष्ट्रवादीत गेलो म्हणून राजकीय सुडापोटी माझ्यावर ईडीची कारवाई केली. माझ्या जावायाला विनाकारण अटकवणं, त्याचा जामीन होऊ न देणं यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. सर्वांनाच जामीन मिळू शकतो. मात्र सव्वा वर्षांपासून माझ्या जवायला जामीन का मिळत नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आमदार खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. चौधरी यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने नुकताच फेटाळून लावला आहे. चौधरी यांनी अनेक शेल कंपन्यातन पैसे गोळा केल्याच दिसत असल्याने आम्ही त्याचा जामीन अर्ज फेटाळत आल्याचं कोर्टाने आपल्या ऑर्डर कॉपी मध्ये म्हटलं आहे. या संदर्भात श्री खडसे यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहे. ते म्हणाले की, मी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळेच मला भोसरी प्रकरणात गोवण्यात आलं आहे. या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, असा अहवाल एसीपीने कोर्टात सादर केला होता. माझ्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेशामुळे जुना अहवाल बाहेर काढण्यात आला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
सरकारने वकीलांचा फौजफाटा उभा केला…
माझ्या जावायाला जामीन मिळू नये यासाठी, राज्य सरकारने वरिष्ठ वकीलांचा फौजफाटा उभा केला आहे. यात सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग सुरू असल्याचे दिसून येत आहे. मला त्रास देण्यासाठी माझ्या जावयाला कुठल्यातरी प्रकरणात अडकवून डांबून ठेवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. यंत्रणेच्या माध्यमातून तरुण उद्योजकाला छेडण्याचा हा प्रयत्न आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.