पुणे: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरील खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले असून, 22 जण जखमी झाले आहेत. पुण्यातील जांभूळवाडी दरी पुलाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. यातील जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहुन मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर चाललेल्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक व ट्रॅव्हलचे कॅबिन चक्काचूर झाले. पहाटे सर्व प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळे अचानक झालेल्या या अपघाताच्या घटनेमुळे प्रवाशांची भंबेरी उडाली. यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत.
18 जखमींचे वाचविले प्राण
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस व अग्निशमन दलाचे जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. पुणे महानगरपालिकेची चार अग्निशमन वाहने व 1 रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून 1 रेस्क्यु व्हॅन अशी एकुण 7 अग्निशमन वाहने जवानांसह घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. अग्निशमन दलाकडून एकुण 18 जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे.