पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी पूर्व परीक्षा 30 एप्रिलला होणार आहे. पण या परीक्षेच्या आधीच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. MPSCच्या हजारो परीक्षार्थ्यांच्या हॉल तिकीटची लिंक सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एमपीएससीकडून या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.
एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो परीक्षार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
आयोगाने केला खुलासा
या सर्व प्रकरणाची एमपीएससीकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. एमपीएससीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे 21 एप्रिल रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर, तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बाह्यलिंकद्वारे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही. तसेच उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा खोटा असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.