मुंबई: दोन कोटींचा विमा लाटण्यासाठी चक्क वैद्यकीय अधीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी बेवारस मृतदेहाला जिवंत व्यक्तीचे नाव दिले. दावा दाखल करण्यासाठी चक्क बनावट आई-वडील देखील उभे केले. विमा कंपनीकडून 2 कोटी रुपये मिळाल्यानंतर अखेर विमा कंपनीपर्यंत हे प्रकरण पोहोचले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.
2015- 16 या कालावधीतील हे प्रकरण असून विमा कंपनीने आरोपी व्यक्तींच्या विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. तपासासाठी गुन्हा नगर जिल्ह्यात वर्ग करण्यात आलेला आहे. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे (रा.करमाळा, जिल्हा सोलापूर ) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी असलेला पोलीस कॉन्स्टेबल कैलास देशमुख हा मात्र फरार आहे.
सहा वर्षानंतर झाला खुलासा
2015 मध्ये एलआयसीच्या मुंबईतील दादर शाखेतून दिनेश प्रमोद टाकसाळे या व्यक्तीने दोन कोटी रुपयांचा विमा घेतलेला होता. 14 मार्च 2017 रोजी दिनेश याचा अपघाती मृत्यू झाल्याची कागदपत्रे सादर करत रकमेवर दावा करण्यात आला. प्रकरण एलआयसीकडून मंजुरी करण्यात आले मात्र त्यानंतर शंका आल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुरूवात झाली. तब्बल सहा वर्ष चौकशी झाल्यानंतर कागदोपत्री मयत दाखवलेला दिनेश टाकसाळे हा जिवंत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी केली तिघांना अटक
दोन कोटी रुपयांचा विमा देखील दरम्यानच्या काळात आरोपींनी हस्तगत केलेला होता. एलआयसीचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश साहू यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा सविस्तर तपास करत दिनेश प्रमोद टाकसाळे सोबतच त्याला मदत करणारे अनिल भीमराव लटके, विजय रामदास माळवदे या तिघांना अटक केलेली होती. सदर प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे.