मुंबई: राज्यातील शिक्षकांची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. राज्यभरात तब्बल 12,653 शिक्षकांचे आधार कार्ड अवैध असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना 30 एप्रिल पर्यंत सर्व शिक्षकांचे आधार कार्ड यू-डायस प्रणालीमध्ये व्हॅलिड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याच्या सुचना शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र, आता शिक्षकांचेच आधार कार्ड या प्रणालीमध्ये अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील साडे बारा हजाराच्यावर शिक्षकांचे स्वतःचे आधारकार्डच या प्रणालीद्वारे व्हॅलिड नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई, पुण्यात अशा शिक्षकांची संख्या सर्वाधिक असून, 1400 हून अधिक शिक्षकांचे आधार अवैध आहेत.
शिक्षकांची पदेच अतिरिक्त होण्याची भीती
प्रत्येक शाळेची संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर दिली. आधार प्रमाणित झाले नाही तर त्या वर्गात विद्यार्थ्यांची संख्या उपलब्ध नाही असे गृहीत धरुन वर्गातील संच मान्यता रद्द केली जाणार आहे. परिणामी शिक्षकांची पदेच अतिरिक्त होण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये धास्ती वाढली आहे. शाळेमध्ये सध्या शिक्षकांच्या मागे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आधार प्रमाणित करण्याचे काम लागले आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी
पुण्यामध्ये 1402 शिक्षक, मुंबईतील बीएसमी शाळेतील मिळून 1455 शिक्षक, ठाण्यात 1322, सोलापूर 617 नाशिक 598,नागपूर 827, पालघर 565, संभाजीनगर 587 शिक्षक असे राज्यभरातील 12653 शिक्षक या यादीमध्ये समोर आले आहेत. विदर्भातील तब्बल 1 हजार 889 शिक्षकांचे आधार कार्ड अपडेट नसून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 247 शिक्षकांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील 165 शिक्षकांच्या आधार कार्ड लिंक होत नसल्याने त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.