जळगाव : उद्धव ठाकरे हे कुटुंबांमध्ये फूट पाडण्याचं पाप करत आहे. कुटुंबात वाद निर्माण करण्याची सुरुवात मातोश्रीने केल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. ठाकरेंना खरंच आमच्या कुटुंबाचा कळवळा असता तर त्यांनी वैशालीताईंना जिथे आहे तिथे सुखी रहा, असा सल्ला दिला असता, असेही किशोर पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात जाहीर सभा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत वैशाली पाटील सूर्यवंशी या ठाकरे गटाच्या उमेदवार असतील अशी घोषणा उध्दव ठाकरेंनी केली. त्यामुळे आता दोघा बहिण-भावातील वाद अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेतील बंडामुळे पाचोऱ्यात पाटील कुटुंबातच कलह निर्माण झाला आहे. आर ओ तात्यांच्या कन्या आणि शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
किशोर पाटलांनी दिला बहिणीला सल्ला
शिवसेनेचे माजी आमदार आणि आपले काका स्व. आर. ओ. पाटील यांनी आपल्याला त्यांचे राजकीय वारसदार म्हणून घोषित केले होते. त्यामुळे त्यांची स्वप्ने आपण पूर्ण करीत आहोत. मात्र आर. ओ. पाटील यांची कन्या व आमची बहीण वैशाली सूर्यवंशी पाटील यांच्या माध्यमातून वडिलांनी सुरू केलेला उद्योग व्यवसाय जगाच्या पाठीवर नेऊन भरभराटीला नेण्याचं स्वप्न बघितलं होतं. ते त्यांनी पूर्ण करावं असा मोलाचा सल्ला शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी बहिणीला दिला.