पुणे : सावत्रभावाने केलेल्या हल्ल्यात भावजयीचा मृत्यू झाला. तर भावाची प्रकृती गंभीर आहे. आंबळे ( ता. शिरूर ) येथे ही घटना घडली असून, हल्ला करून घटनास्थळावरुन दुचाकीवरून पलायन करणाऱ्या आरोपी देखील अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत भावजय प्रियंका सुनील बेंद्रे (वय 25) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती सुनील बाळासाहेब बेंद्रे यांची प्रकृती गंभीर आहे. तर घटनास्थळावरुन दुचाकीवरून पलायन करणारा आरोपी अनील बाळासाहेब बेंद्रे याचा आंबळे येथे अपघात झाल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे.
डंबेलने व चाकूने केले वार
सुनील बाळासाहेब बेंद्रे व प्रियंका सुनील बेंद्रे हे राहत्या घरात झोपलेले असताना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे याने सावत्र भाऊ सुनील बेंद्रे व भावजय प्रियंका बेंद्रे यांना व्यायामासाठीच्या डंबेलने मारहाण व चाकूने वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, सहाय्यक फौजदार गोपीचंद चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.