मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे फक्त मोठा बँक बॅलन्स नाही, तर त्यांचे हृदयही मोठे असल्याचे दिसून आले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे मुकेश अंबानी यांनी अलीकडेच आपल्या एका जुन्या कर्मचाऱ्याला 1,500 कोटी रुपयांचे घर भेट दिले आहे.
रिलायन्ससाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या मनोज मोदी यांना मुकेश अंबानी यांनी 22 मजली इमारत भेट दिली आहे. अंबानींचा उजवा हात म्हटल्या जाणार्या मनोज मोदी हे कंपनीच्या स्थापनेपासूनच सोबत आहेत. ते रिलायन्सचे कर्मचारीच नाही तर मुकेश अंबानींचे मित्रही आहे.
कोण आहेत मनोज मोदी
मनोज मोदी हे मुकेश अंबानींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांना मुकेश अंबानींचा उजवा हात देखील म्हटले जाते. रिलायन्सच्या सर्व व्यवहारांच्या यशामागे त्यांचा हात आहे. वर्षानुवर्षे ते कंपनीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पणाने अथकपणे काम करत आहेत. केवळ मुकेश अंबानीच नाही तर त्यांची मुले आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी यांचाही मनोज मोदींच्या प्रत्येक निर्णयावर विश्वास आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत आता अंबानी कुटुंबाने त्यांना एक अनमोल भेट दिली आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या जुन्या कर्मचारी आणि मित्रासाठी मुंबईतील एका पॉश भागात 22 मजली इमारत खरेदी केली आहे.
22 मजली इमारत भेट दिली
अंबानी कुटुंबाने मनोज मोदींसाठी मुंबईतील नेपियन सी रोड येथे 22 मजली इमारत खरेदी केली आहे. या मालमत्तेला वृंदावन असे नाव देण्यात आले आहे. नेपियन सी रोड हा मुंबईचा पॉश एरिया आहे. येथील मालमत्तेचे दर 45,100 रुपये ते 70,600 रुपये प्रति चौरस फूट आहेत. या इमारतीची किंमत 1,500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही इमारत 1.7 लाख चौरस फूट क्षेत्रात बांधली आहे.
मुकेश अंबानींचा उजवा हात
मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे महाविद्यालयीन मित्रही आहेत. अंबानी आणि मोदी दोघेही वर्गमित्र आहेत. दोघांनी विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून एकत्र शिक्षण घेतले आहे. अभ्यासानंतर जेव्हा मुकेश अंबानी रिलायन्समध्ये काम करू लागले तेव्हा त्यांनी मनोजलाही आपल्यासोबत बोलावले. मनोज मोदी 1980 पासून रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित आहेत. व्यवसायातच नव्हे तर अंबानी कुटुंबातही त्यांचा आदर आहे. मुकेश अंबानी स्वतः त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात. तो अंबानी कुटुंबातील मुलांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतो. रिलायन्सच्या यशामागे त्याचा मेंदू असल्याचेही बोलले जात आहे. रिलायन्समध्ये त्यांना एमएम म्हणून संबोधले जाते.