राजमुद्रा वृत्तसेवा | पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच सुरू झालेली इंधन दरवाढ अजूनही कायम आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये जून महिन्यातील १६वी दरवाढ नोंदवण्यात आली. आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३५ पैसे वाढ झाली. तर डिझेल प्रति लिटरमागे २८ पैशांनी वाढले. त्यामुळे आधीच गगनाला भिडलेल्या इंधनाच्या किंमतीमुळे भडका उडाला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबादसह महत्त्वाच्या शहरात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली असून, या इंधन दरवाढीचे चटके सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागले आहेत.
पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ होण्याची मालिका सुरुच आहे. मंगळवारी इंधनाचे दर आणखी वाढले. पेट्रोलचे दर लिटरमागे ३५ पैसे, तर डिझेल लिटरमागे २८ पैशांनी महागले. त्यामुळे इंधन दरवाढीचा वणवा दिवसेंदिवस भडकताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही पेट्रोलच्याच मार्गावर वाटचाल करताना दिसत आहे. मंगळवारी दरवाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ९८.८१ रुपयांवर गेले. तर डिझेलचे दरही प्रति लिटर ८९.१८ रुपयांवर गेले आहेत. तर मुंबईत पेट्रोल १०४.९० तर डीझेल ९६.७२ रुपयांवर आहे.
नव्या दरवाढीमुळे जळगावातील पेट्रोलच्या दराचा भडका उडाला आहे. जळगावातील पेट्रोलचे दर लिटरमागे १०६.०७ रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे दरही शंभरीचा दरवाजा ठोठावताना दिसत आहे. मंगळवारी जळगावातील डिझेलचा दर प्रति लिटर ९६.३६ रुपयांवर पोहोचला.