जळगाव : मेहरूण येथील रामेश्वर कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. २६ एप्रिल रोजी घडली आहे. तरुणाने मृत्त्यूपूर्वी “सुसाईड नोट” लिहिली असून त्यात शेजारी राहणाऱ्या तिरमल कुटुंबियांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
उमेश एकनाथ ठाकूर (वय-३७) रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. उमेश ठाकूर हा आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह राहतात. बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांचा मुलगा ओम याच्या लक्षात आल्याने समोर आला. मृतदेह पाहून पत्नी व आईने एकच हंबरडा फोडला होता. उमेश वाहतूक पोलिसांकडे ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांना सापडली सुसाईड नोट
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत उमेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी उमेशने सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. यामध्ये घराशेजारी राहणाऱ्या तिरमल परिवाराला उमेशने दोषी धरले आहे. त्यात शेजारील रहिवासी मानसिक त्रास देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याचे म्हटले आहे.