भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. आता तर चोरट्यांची हिंमत आणखीच वाढली असून, भरदिवसा चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील मुक्ताई कॉलनीत बंद घरातून चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील मुक्ताई कॉलनीतील मंगलमूर्ती हाईटस्मध्ये तुलसीदास चंद्रकांत चौधरी (वय ६८) हे पत्नी कल्पनासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मोठा मुलगा मोहनीष हा विदेशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे तर लहान मुलगा रजनीश हा पुण्यात नोकरीनिमित्त स्थायीक आहे. तुळशीदास चंद्रकांत चौधरी हे आमोदा (ता.यावल) येथे वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
घरात कुणीही नसल्याने हीच संधी चोरट्यांनी साधली. भरदिवसा चोरट्यांनी घरात घुसून मुद्देमाल लंपास केला. चंद्रकांत चौधरी हे घरी परतल्यावर घराचा दरवाजा उघडाच दिसला. त्यांनी लागलीच घरात जाऊन पाहणी केली असता, चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच पोलीसांना माहिती दिली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.