जळगाव : जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीवरुन राजकारण तापले आहे. अशात मुक्ताईनगर तालुक्यात खरेदी विक्री संघाची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये आमदार एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलने उमेदवार दिले होते. यात खडसेंच्या पॅनलचे सर्वच्या सर्व १५ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे खरेदी-विक्री संघाची सत्ता राखण्यात आमदार खडसेंना एकहाती यश मिळाले आहे.
मुक्ताईनगर तालुका सहकारी खरेदी विक्री संघावर गेल्या ४० वर्षांपासून आमदार एकनाथ खडसेंची सत्ता आहे. यात १५ संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये खडसे समर्थक शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागांवर उमेदवार दिले होते. मुक्ताईनगर खरेदी विक्री संघावर १९८३ पासून एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. खडसे भाजपमध्ये असतानाही हा शेतकी संघ त्यांच्यात ताब्यात होता. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही सर्व संचालक आमदार खडसेंच्या बाजूने आहेत. या शेतकी संघात ११०० सदस्य आहेत. सर्व सभासदांनी शेतकरी पॅनलवर विश्वास दर्शवल्याने निवडणूक बिनविरोध झाली. आगामी काळात शेतकी संघाच्या माध्यमातून शेतमालासाठी अत्याधुनिक गोदाम तसेच इतर अत्यावश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न राहिला, असे एकनाथ खडसे म्हणाले.
बिनविरोध निवड झालेले संचालक
यामध्ये व्यक्तिशः मतदारसंघात प्रल्हाद जंगले, चंद्रकांत बढे, निवृत्ती पाटील. महिला राखिव गटात– सुरेखा पुंजाजी चौधरी, अलका एकनाथ झांबरे. इतर मागासवर्गीय मतदारसंघात- प्रभाकर झोपे, अनुसूचित जाती मतदारसंघात– प्रशांत भालशंकर, भटक्या जाती जमाती मतदारसंघात– मधुकर गोसावी. सर्व साधारण सहकारी मतदारसंघात- ज्ञानदेव बढे, शांताराम गव्हाळ, सोपान दुट्टे, गोपाळ पाटील, नरेंद्र पाटील, दत्तू पाटील, पुंडलिक कपले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.