हरियाणाच्या नूह जिल्ह्यामध्ये पाय पसरवलिलेल्या सायबर क्राईमविरोधात हरियाणा पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. जवळपास 5 हजार पोलिसांनी 16 गावांमध्ये छापेमारी केली. यात 125 हॅकर आणि सायबर क्राईमच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांची एटीएम, स्मार्टफोन, लॅपटॉप, आधार कार्ड आणि एटीएम स्वाईप मशीनसोबत अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. हरियाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने याची माहिती दिली आहे.
सायबर क्राईमचा हॉटस्पॉट
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना नूह जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून सायबर फ्रॉडशी संबंधीत सूचना मिळाल्या होत्या. एका खोलीमध्ये बसून काही लोक दुसऱ्या लोकांची बँक खाती रिकामी करत होते. यामुळे तपासात पोलिसांनी सायबर क्राईमचा हॉटस्पॉट एरिया ठरविला आणि या ठिकाणी मोठ्या पोलीस फोर्सद्वारे छापे मारण्यात आले.
पोलिसांचा तगडा फौजफाटा
ही कारवाई करण्यासाठी, हरियाणा पोलिसांनी 5 हजाराहून अधिक पोलिसांची स्वतंत्र टीम तयार केली होती. 1 एसपी, 6 अतिरिक्त एसपी, 14 डीएसपी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सायबर क्राईमविरोधातील मोहिमेत भाग घेतला होता. सायबर ठगांवर ही कारवाई विविध जिल्ह्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या पोलिसांच्या 102 छापा पथकांनी केली. एकाच वेळी या गावांमध्ये छापे मारण्यात आले.