पुणे : एका 21 वर्षीय युवकाला मारहाण करत मलमूत्र खाण्यास भाग पाडल्याचे घृणास्पद प्रकार काटी (ता. इंदापूर) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण येथील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा आरोपीच्या मुलीबरोबर विवाह जमला होता. परंतु, हुंड्याच्या कारणावरून मुलीच्या आईवडिलांनी लग्नास विरोध करुन दुसऱ्या नातलगाबरोबर तिचे लग्न जमवले होते. त्यामुळे फिर्यादी आणि मुलगी पळून गेले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. ते दोघे सातारा जिल्ह्यात असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना पकडून 11 एप्रिलला काटी गावी आणण्यात आले.
युवकाकडे मागितला 5 लाखांचा हुंडा
काटी गावात आणल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी युवकाकडे 5 लाख हुंडा मागितला. पण युवकाने त्यास नकार दिल्याने त्याला मारहाण केली. देवाच्या नावाने आरडाओरडा करत फिर्यादीला लिंबू, हळद लावून शिव्या शापही दिला. तसेच मानवी विष्ठा आणि लघवी पिण्यासारखे घाणेरडे कृत्य करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी 11 जाणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दिनकर उर्फ दिनेश शिंदे, लखन काळे, भीमराव शिंदे या तिघांना अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत.