जळगाव : तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात भावासोबत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या तरूणावर बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र हल्ल्याची चाहूल लागताच गळ्यावर बिबट्याने पंजे मारताच पूर्ण ताकद एकवटून तरुणाने बिबट्याला अंगावरूनच थेट बाजूला फेकले. तसेच आरडाओरडा करू लागला. त्यामुळे हादरलेल्य्या बिबट्याने जंगलात पळ काढला
मदन सुखदेव अहिरे (वय २५, रा. मन्यारखेडा ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावात परिवारासह तो राहतो. त्याचा मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (वय २८) हा त्याला गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात रविवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सरपण गोळा करायला गेला होता. त्यावेळी राजेंद्र हा थोडा पुढे होता. तर मदन मागे राहून लाकडे गोळा करीत होता. त्यावेळी अचानक झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने मदनवर हल्ला केला. मात्र हल्ल्याची चाहूल लागताच मदनने बिबट्याला पूर्ण ताकद लावून बाजूला फेकले. मदनने हिम्मत ठेऊन आरडाओरडा करून भावाला आवाज देताच भाऊ राजेंद्रने धाव घेतली. राजेंद्रने मदनला नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले.