मुंबई: राज्यात राजकिय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदावरुन दावे-प्रतिदावे केले जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
राज्यातील राजकारण अस्थिर झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावे लागल्यास पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चा सुरु झाली आहे. यात विरोधी पक्षनेते अजित पवारांचे नाव चांगलेच चर्चेत आले. राज्यात काही ठिकाणी अजित पवार हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे बॅनर झळकले होते. त्यावरून देखील चर्चा सुरू असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरून महत्वाचे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादीला जनतेचा मोठा पाठिंबा
जयंत पाटील म्हणाले की, “सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचं आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार आहे, हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल,” असं मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे.
अजितदादा आणि माझ्यात स्पर्धा नाही
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं विधान केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं. यावर जयंत पाटील म्हणाले, जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. अजितदादा आणि माझ्यात कोणाशीही स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी ही कार्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचे केवळ मत इथंपर्यंतच या गोष्टी मर्यादित आहेत.