मुंबई : यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण नुकतेच झाले, मात्र भारतात ते पाहता न आल्याने अनेकांची निराशा झाली. आता चंद्रग्रहणाचा पूर्ण आनंद देशवासीयांना घेता येणार आहे. यंदाचे पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी बुध्द पौर्णिमेला होणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीही चंद्रग्रहण होत असताना सुमारे 130 वर्षांनंतर असा मोठा योगायोग घडत असल्याचे मानले जाते.
चंद्रग्रहण ही एक आकर्षक खगोलशास्त्रीय घटना आहे. आपल्या सौर मंडळाच्या कार्याबद्दल आणि खगोलीय पिंडांच्या हालचालींबद्दल अधिक जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. हे ग्रहण पेनम्ब्रल असेल म्हणजे ग्रहणातही चंद्राच्या तेजस्वीतेवर फारसा फरक पडणार नाही.
चंद्रग्रहणाचे खगोलीय महत्व
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच दिसते. चंद्रग्रहणात आपण चंद्रावर पडलेली पृथ्वीची सावली पाहत असल्याने पृथ्वीच्या अनेक भागातून हे संबंधित वेळी दिसते. यावेळी 5 मे रोजी चंद्रग्रहण पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. मात्र, सावलीने चंद्राचा पूर्ण भाग झाकलेला नसेल. पृथ्वीच्या बाह्य सावलीने चंद्र झाकलेला असेल, पण त्याची प्रकाशमय आभा दिसत राहील.
भारतात कधी दिसणार ग्रहण
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चंद्रग्रहण भारतातील अनेक भागांमध्ये पाहता येणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, उत्तर दक्षिण आफ्रिका, आर्क्टिक, अंटार्क्टिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरासह आशियातील अनेक देश दृश्यमान असतील. भारतातून साधारणत: रात्री 8:44 वाजल्यापासून ग्रहण पाहता येईल. रात्री 10:30 पासून ग्रहण वाढलेले असेल आणि रात्री 10:52 वाजता सर्वाधिक झाकलेला असेल. रात्री 1 वाजता ग्रहण संपेल. भारतातून 4 तास 18 मिनिटे हे ग्रहण चालेल.