जळगाव : एकीकडे महाराष्ट्रात कामगार दिन साजरा केला जात असताना जळगाव एमआयडीसीतील कंपनीतच तरूणाने विषारी औषध सेवन करून साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरूणाने गळफास घेतला नसून संशयास्पद मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मूळ शिरपूर तालुक्यातील विखरण येथील रहिवाशी असलेले संजय बंडू शेवाळे (वय-३६) हे गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील मेहरूण परिसरत आई, पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला असून तो एमआयडीसी परिसरातील साईराम ट्रेंडींग कंपनीतील कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कामाला होता. नेहमीप्रमाणे रविवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता जेवणाचा डबा घेवून संजय शेवाळे हा कंपनीत कामावर गेला होता. सोमवारी १ मे रोजी कामगार दिन असल्यामुळे कंपनी बंद होती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीतील सफाई कर्मचारी हा साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी लोखंडी अँगलला संजय शेवाळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तातडीने एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती कळविली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
अकस्मात मृत्यूची नोंद
रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, संजय याने आगोदर विषारी औषध घेतले त्यानंतर गळफास घेतले असल्याचे पोलीस सुत्रांकडून माहिती मिळाली. त्यामुळे तरूणाची आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मयताच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी आश्विनी, विवाहित बहिण, दुर्गेश (वय-४) आणि सलोनी (वय-६) ही दोन मुले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.