मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आग्रहीपणे मागणी करत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी ही बैठक होत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची गळ या बैठकीत घालण्यात येत आहे. यावेळी शरद पवारांसह अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला हजर होते. यावेळी शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावं अशी गळ पक्षाच्या नेत्यांनी पवार यांना घातली आहे. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे नवा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार शरद पवार यांनी राज्यसभेची टर्म संपेपर्यंत तरी अध्यक्षपदी राहावं, अशी मागणी करण्यात आली आहे. शरद पवार यांची तीन वर्षाची राज्यसभेची टर्म बाकी आहे. त्यामुळे ही टर्म पूर्ण करेपर्यंत पक्षाचं नेतृत्व करावं असं या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यावर आता पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
छगन भुजबळांनी दिला फॉर्म्युला
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केंद्रात लक्ष घालावं आणि अजित पवार यांनी राज्यात लक्ष घालावं असं ठरताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तसा फॉर्म्युला दिला आहे. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे. केंद्रात ताई आणि राज्यात दादा हा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य नाही. शरद पवार यांच्याच नेतृत्वात आम्हाला काम करायचं आहे. इतर नेतृत्व नकोच, असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू करत शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी मागणी केली आहे. शरद पवार यांनी आपली भूमिका बदलावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. पवार यांनी लोक भावनेचा आदर करावा, आणि आपला निर्णय मागे घ्यावा, देशाला त्यांची गरज आहे, तुम्ही भीष्म पितामह आहात त्यामुळे आपला राजीनामा मागे घ्यावा, आमची लढाई ही तुम्ही असल्यामुळे लढत आहेत, त्यांच्यावर विश्वास होता म्हणून आम्ही लढाई लढत राहत होतो. त्यामुळे निर्णय मागे घ्यावा, असेही आव्हाड म्हणाले.