जळगाव: जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपद निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यात लढत रंगली. प्रचारात दोघांनी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र, निकालानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला धक्का बसला आहे. मविआने 10 जागा मिळवून भाजपा शिंदे गट युतीचा दणदणीत पराभव केला. भाजप शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. या निकालामुळे गुलाबराव देवकरांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिध्द केले आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही गुलाबरावांच्मया युध्दात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जळगाव बाजार समितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील नेतृत्वाखाली सत्ता होती. त्यावेळी भाजप व शिवसेना (उबाठा) सोबत होती. मात्र शिवसेना पक्षफुटीनंतर समिकरण बदलले. भारतीय जनता पक्ष आता गुलाबराव पाटील याच्या शिंदे गटासोबत आहे. तर शिवसेना (उबाठा) गट काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आहेत. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाची सत्ता आता खालसा झाली असून गुलाबराव देवकरांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती शिवसेनेच्या हातून निसटली आहे. देवकरांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून सत्ता उखडली.
कोट्यवधींचा निधी देऊनही पदरी निराशाच
जळगाव बाजार समितीत जळगांव ग्रामीण मतदार संघाचा मोठा भाग आहे. त्यामुळे या मतदार संघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी आमदार व माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाची खरी लढत झाली. ग्रामपंचायत मतदार संघात पालकमंत्र्यांचे पॅनल पराभूत झाले. पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निधी दिला. कोट्यवधींच्या पेयजल योजनांना मंजुरी दिली. तरी देखील मतदारांनी शिंदे गटाकडे पाठ फिरवत देवकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याचे दिसून आले. या निवडणुकीत देवकरांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिध्द केलं आहे. या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पडसाद उमटणार
पालकमंत्री गुलाबराव पाटलांना निधी किंवा भाषण देउन मतदारांना वळवता आलं नाही. मात्र विरोधात असूनही देवकारांची जादूची छडी चालली. देवकरांनी असे मोहरे उभे केले तिथे गुलाबरावांची शक्ती क्षीण झाली. एकीकडे गुलाबरावांनी सभांचा धडाका लावला असताना देवकारांनी शांततेत काम केलं. यातून सहकारात पाळेमुळे मजबूत करण्याचा प्रयत्न होणार आहे. पक्षात गटबाजी असताना देवकरांनी यशस्वीरित्या धनुष्यबाण पेलला. याचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये दिसून येतील.
शिंदे गटात वादाला फुटले तोंड
शिंदे गटात या निवडणुकीवरुन वाद निर्माण झाले असून, तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यात जिल्हाध्यक्ष निलेश पाटील असून, त्यांच्यासाठी शिंदे गटाकडून हि पहिलीच निवडणूक होती. यानंतर आता शिंदे गटात वाद निर्माण झाले असून, संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभी राहीली आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील हे आव्हान कसे पेलतील हे आगामी काळात पहावे लागणार आहे.