मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताना आणि अध्यक्षपदाचा राजीनामा देताना पुढील अध्यक्ष कोण असावा, याबाबत समितीची घोषणा केली. या समितीत राष्ट्रवादीचे सगळे उच्चपदस्थ आणि वरिष्ठ नेतेमंडळींच्या समावेशाची घोषणा केली. पण या सगळ्यात भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या ज्येष्ठ नेत्याचा समावेश करणं शरद पवार विसरले होते. पण आता दोन दिवसांनंतर पवारांच्या आठवणीत आल्याने त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना ताबडतोब सूचना केलीये.
योग्यवेळी भाकरी फिरवावी लागते, नाहीतर ती करपते, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार गेल्या आठवड्यात म्हणाले आणि पुढच्याच आठवड्यातच त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरूवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याचं सांगत पक्षाला नवं नेतृत्व द्यावं, त्याला बळकटी द्यावी, अशा हेतूने आपण हा निर्णय घेतल्याचं पवारांनी सांगितलं आणि सर्वांनाच धक्का दिला. तसेच राष्ट्रवादीच्या पुढचा अध्यक्ष कोण असावा? याचा निर्णय समितीही जाहीर करेन, असं सांगून समितीतल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. पण या समितीत भाजपमधून आलेल्या वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंना स्थान दिलं गेलं नव्हतं.
संघटनेसाठी खडसेंनी लावलाय जोर
एकनाथ खडसे यांचा राजकारणातील अनुभव दांडगा आहे. मुंडे-महाजनांच्या तालमीत तायर झालेलं नेतृत्व म्हणून खडसेंकडे पाहिलं जातं. परंतु २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यातील संघर्षामुळे खडसे त्रस्त झाले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत तर त्यांना पक्षाने तिकीटही नाकारलं. निवडणुकीनंतर २ वर्ष खडसेंनी सहन केलं. पण नंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. गेल्या २ वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या संघटनबांधणीसाठी खडसे काम करतायेत. हेच लक्षात घेऊन पवार यांनी खडसेंना निरोप धाडलाय.
उद्या होणार बैठक
शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना खडसेंना तातडीने मुंबईत बोलावून घ्या, अशी सूचना केली. अध्यक्ष निवड समितीत एकनाथ खडसे यांचाही समावेश करा, अशा सूचना पवारांनी पटेल यांना दिल्याची माहिती आहे. पटेल यांनीही खडसेंना फोन करुन तातडीने मुंबईकडे रवाना व्हा, अशी सूचना केली आहे. शुक्रवारी (उद्या) होत असलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी खडसेंना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.