मुंबई : बारावीपर्यंत शिक्षण घेऊनही एका दिवसात 5 ते 10 कोटी रुपये कमावणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तपास केला असता, तो ऑनलाइन ठग असल्याचा खुलासा झाला. त्याच्या टीमचे सदस्य अनेक शहरांमध्ये पसरलेले आहेत. त्याची टीम पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लक्ष्य करत असे. चुकीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. अशा प्रकारे ही टोळी दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करत असे.
पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, मुख्य सूत्रधार श्रीनिवास राव दाढी (वय 49) याला बांगूर नगर पोलीस स्टेशनच्या पथकाने हैदराबादमधील एका आलिशान हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्याने फक्त 12 वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे, पण तंत्रज्ञानात तो पारंगत आहे. पोलीस उपायुक्त पुढे म्हणाले की, श्रीनिवाससोबत त्याच्या टोळीतील आणखी चार जणांनाही अटक करण्यात आली आहे. यातील दोघांना ठाण्यातून तर दोघांना कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे.
पोलीस असल्याचे सांगून द्यायचे धमकी
पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल पुढे म्हणाले की, ही टोळी स्वत:ला पोलीस असल्याचे दाखवून फसवणूक करत असे. ही टीम लोकांना फोन कॉल करत असे, यात बहुतेक महिलांचा समावेश होता. ज्यांना फोन करण्यात आला त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या ऑर्डर केलेल्या पार्सलमध्ये (कुरिअर) ड्रग्ज किंवा शस्त्रे आहेत. ही टोळी ज्या महिला किंवा पुरुषाला फोन करायची, त्यांच्याकडून बँक खात्यांचा तपशील मागायची. कुरिअर व्हेरिफिकेशन बँकेच्या तपशिलाद्वारे सांगण्यात आले. तसेच कुरिअर कोणाचे आहे, हे यावरून कळवू, असेही सांगण्यात आले. पोलीस उपायुक्त पुढे म्हणाले की, बहुतेक लोक फोन कॉलला घाबरायचे आणि टोळीला त्यांची बँक किंवा आयकर तपशील द्यायचे.
मोबाईल हॅक करुन फसवणूक
यानंतर वन टाईम पासवर्ड (OTP) देखील पीडितांनी शेअर केला. महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर फसवणूक करणारे लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढायचे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनेक प्रकरणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांनी लोकांचे मोबाईल हॅक करून लोकांना त्यांच्या मोबाईलवर Anydesk सारखे अॅप डाउनलोड करायला लावले. या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की अशा प्रकारे दाढी आणि त्याच्या टोळीने देशभरातील हजारो लोकांना लक्ष्य केले आहे.
फसवणुकीची कमाई क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रान्सफर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचे सर्व पैसे दाढीच्या खात्यात जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, एका दिवसात 5 कोटी ते 10 कोटी रुपयांचे व्यवहार खात्यात होत असत. दाढी हा सर्व पैसे चीनमधील एका नागरिकाला पाठवायचा आणि ही रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रान्सफर करायचा.
रिअल इस्टेटचा खोटा धंदा
दाढी याने रिअल इस्टेटचा व्यवसाय करण्याचे नाटक केले. लोकांशी संपर्क साधण्यासाठी टेलीग्राम अॅपचा वापर केला जात होता. आतापर्यंत पोलिसांनी दाढीने वापरलेली 40 बँक खाती सील केली आहेत आणि त्यांच्याकडून 1.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. दाढीच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. टोळीतील इतर सदस्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.