जळगाव: जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल पराभूत झाले. शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली मविआने 10 जागा मिळवून शिंदे गटाला धुळ चारली. बाजार समितीत गुलाबरावांचे पॅनल विजयी झाले असले तरी चर्चा मात्र, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांचीच होत आहे.
जळगाव बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तर सर्वसाधारण गटातून महापौर जयश्री महाजन यांचे पती महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन तब्बल ४०० मते घेवून विजयी झाले आहेत. सुनील महाजन हे शहरातील उमेदवार असताना सुध्दा ग्रामीण भागातील सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची चर्चा सर्वाधिक होत आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी सभापती लकी टेलर यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना जास्त मतं मिळण्याची अपेक्षा होती. मात्र सुनील महाजन यांनी जोरदार फलंदाजी करत, ४०० मतं खेचून आणले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पुढची मोहिम शहर की ग्रामीण
जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांचे पती तथा महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी राजकीय कारकीर्द सध्या फार्मात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेपाठोपाठ त्यांनी जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ आणि आता बाजार समिती निवडणुकीत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचे पुढील लक्ष विधानसभेची घोडदौड करण्याचे असल्याचे बोलले जात आहे. अर्थात त्यांना संधी मिळाल्यास ते जळगाव ग्रामीणमधून उमेदवारी करु शकतात. मात्र, बडे नेते रांगेत असताना महाजनांना नेमकं शहर कि ग्रामीण कुठून नशीब चमकते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.