जळगाव: जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने भाजप- शिंदे गटाच्या पॅनलचा पराभव करून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे बाजार समितीचे सभापतिपद देखील महाविकास आघाडीकडेच राहणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी सुनील महाजन, लक्ष्मण पाटील व श्यामकांत सोनवणे या तिघांची नावे चर्चेत आहेत.
या तिन्ही संचालकांमधूनच एका संचालकाला सभापतिपद जाणार हे निश्चित मानले जात आहे. कारण, बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेलमध्ये सुनील महाजन, लक्ष्मण पाटील व श्यामकांत सोनवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सभापतिपदासाठी या तिन्ही संचालकांच्याच नावांची चर्चा आहे; मात्र आता सर्वांत पहिले सभापतिपद कोणाला? हा निर्णय महाविकास आघाडीचे सर्व संचालक घेणार आहेत.
जिल्हा बँकेच्या धक्क्यानंतर ‘मविआ’ सजग
जिल्हा बँकेच्या चेअरमन निवडीच्या वेळेस मविआ’चे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने राष्ट्रवादीच्याच संजय पवारांना समर्थन देऊन, सत्ता उलथवून लावली होती. त्यामुळे भाजप शिंदे गटाकडे सध्या बहुमत नसले तरी भाजपच्या डावपेचांपासून मविआ देखील सावध झाली आहे. सभापती पदाचा निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मविआचे संचालक सहलीवर जाण्याच्या तयारीत आहेत. जेणेकरून निवडीच्या वेळेस संचालक फुटू नये अशी भीती मविआला आहे. त्यामुळे मविआची 11 संचालक सहलीवर जाण्याचा बेत आखात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सभापतिपदासाठी ठरणार फॉर्म्युला
मविआच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील महाजन, श्यामकांत सोनवणे व लक्ष्मण पाटील या तिघांमध्येच सभापतिपद विभागून दिले जाणार आहे. त्यामुळे दीड-दीड वर्ष व शेवटचे सभापतिपद घेणाऱ्याला २ वर्षे किंवा २०-२० महिन्यांचा फॉर्म्युला देखील ठरण्याची शक्यता आहे; तसेच या तिन्ही संचालकांव्यतिरिक्त इतर संचालकालाही सभापतिपद द्यायचे की नाही? याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीतच होणार आहे. १२ किंवा १३ मे रोजी सभापतिपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. जळगावसह जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे.