बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील कालव्यातून मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल सापडल्याची माहिती समोर आली आहे. आज अचानक लोकांना समजले की, मुरादाबादच्या कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल फेकण्यात आली आहे, त्यानंतर याठिकाणी लोकांची झुंबड उडाली. आजूबाजूचे लोक पाण्यात उतरले आणि नोटांचे बंडल घेऊन पळू लागले. 10 आणि 100 च्या नोटांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर लोकांकडून नोटा लुटतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
स्थानिकांनी सांगितले की, सकाळी नदीपात्रात आंघोळ करताना लोकांना नोटांचे बंडल पाण्यात तरंगताना दिसले. तेव्हा आजूबाजूच्या जमावाने पाण्यात उतरून नोटांचे बंडल लुटण्यास सुरुवात केली. काही वेळातच लोकांची मोठी गर्दी जमली. या प्रकरणाबाबत परिसरातील नागरिकांमध्येही विविध चर्चा सुरू आहेत. माहिती मिळताच मुफसिल पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांच्या जमावाला पळवून लावले. या प्रकरणाबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, ही अफवाही असू शकते, मात्र तपासानंतरच काही सांगता येईल. पोलीस सर्व मुद्यांवर तपास करत आहेत. त्याचबरोबर ही रोकड आली कुठून, असे अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. या नोटा असली आहे की नकली? काळ्या पैशाबाबतही लोक चर्चा करत आहेत. मात्र, ही सर्व बाब तपासानंतरच स्पष्ट होईल.