जळगाव : उद्धव ठाकरे यांना आमच्यावर टीका करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे आम्ही फारसे लक्ष देत नसल्याचे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावात पत्रकारांशी बोलतांना सांगितले. महाड येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. याबाबत पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना विचारले असता, पालकमंत्र्यांनी याबाबत संयमाची भूमिका घेत उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले आहे.
दरम्यान,राष्ट्रवादीचे आ.एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत, एकीकडे राज्यात गारपीट, वादळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नसताना, दुसरीकडे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र कर्नाटकात प्रचार करत फिरत असल्याची टीका केली होती. याबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता, पालकमंत्र्यांनी सांगितले की, बऱ्याच ठिकाणी पंचनामे झाले आहेत. तसेच शासनाकडे नोंद असते की, कोणत्या भागात पाऊस पडला व नुकसान झाले, अशा भागात पंचनामे केलेच जातात. मात्र,जर एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी पंचनामे झाले नसतील तर, त्याबाबतदेखील तहसीलदारांना आदेश देवून, राहिलेले पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.