जळगाव : विक्री केलेल्या घरात लिव अॅन्ड लायसनन्स करारना करुन राहणाऱ्या कुटुंबाने खोटे दस्ताऐवज करुन पाच लाखात घर बळकाविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खोटे नगरजवळील दिव्य जीवन वाटीका आश्रमजवळ संदीप शिवराम गुजर हे वृद्ध वास्तव्यास आहे. त्यांचा मेहरुन महाबळ शिवारातील घर त्यांनी 2008 मध्ये अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी यांच्याकडून 5 लाखात विकत घेतले होते. तेच घर 2019 मध्ये अमित सुरेंद्र भाटीया यांना 12 लाख 90 हजारात विक्री केली केले. तेव्हापासून या घरामध्ये अनिरुद्ध कुलकर्णी हे त्यांच्या कुटुंबासोबत लिव अॅन्ड लायसन्स करारनामानुसार राहत होते. भाटीया यांनी घर खरेदी करण्यापुर्वी अनिरुद्ध कुलकर्णी यांना पत्र देवून घर खाली करण्यास सांगितले होते. मात्र करारनाम्याची मुदत न संपल्याने कुलकर्णी यांनी घर खाली केले नाही. करार मुदत संपल्यावर नवीन मालक अमित भाटीया यांना परस्पर ताबा देण्याचे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी मान्य केले होते. त्यानंतर घर मालकासह महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता कुलकर्णी यांनी वरच्या मजल्याचे बांधकाम सुरु केल्याने भाटीया यांनी कुलकर्णी कुटुंबियांविरुद्ध घर खाली करुन मिळावे यासाठी न्यायालयात दावा दाखल केला.
असा आहे बनावट करारनामा
दावा दाखल झाल्यानंतर कुलकर्णी यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी न्यायालयात सात कागदपत्रे दाखल केली. यामध्ये 9 जुलै 2007 रोजीचा आपसात समजोतीचा करार नामा होता. यावर मुद्रांक विकत घेणारा मिलिंद नारायणराव सोनवणे रा. जळगाव करार लिहून देणारा संदीप शिवराम गुजर व लिहून घेणारा अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी यांच्या करार नाम्याची झेरॉक्स प्रत होती. या करारनाम्यात पाच लाख हातउसनवारीने दिलेल्या पैशांच्या बदल्यात वसुलीच्या सुरक्षीततेसाठी हे घर लिहून देणाऱ्याच्या खरेदीखतावर नोंदवून द्याययची आहे. तसेच खरेदीखत करुन घेतल्यानंतर सरकारी दप्तरी नावावर फेरफार नोंद करायची नाही.
फसवणूक होताच दिली पोलिसात तक्रार
न्यायालयात सादर केलेला करारनामा खोटा व बनावट असून त्यावर संदीप गुजर यांची स्वाक्षरी देखील बनावट असल्याचे दिसून आले. त्यांनी अनिरुद्ध कुलकर्णी यांना हा करारनामा कधीही करुन दिलेला नाही. तसेच नोटरी करणारे कालिंदी चौधरी यांना ओळखत नसून त्यांच्याकडील रजिस्टवर देखील सही केलेली नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे संदीप गुजर यांना समजले. त्यांनी लागलीच शनिवारी रात्री शहर पोलीसात धाव घेत तक्रार दिली.
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
त्यानुसार अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी, सुभद्रा अनिरुद्ध कुलकर्णी, अनिकेत अनिरुद्ध कुलकर्णी तिघ रा. शारदा कॉलनी, मिलिंद नारायण सोनवणे रा. नुतनवर्षा कॉलनी महाबळ, मंगल चंपालाल पाटील, ए. पी. बावस्कर, रा. शेगाव ता. जि. बुलढाणा यांनी नवीपेठेतील कालिंदी चौधरी यांच्या ऑफीसात संगनमत करुन खोटा दस्ताऐवजावर खोट्या स्वाक्षरी करुन न्यायालयात सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्र केले होते न्यायालयात सादर
घराचा कोणाशीही व्यवहार करायचा नाही, जो पर्यंत व्याजाने घेतलेली रक्कम व्याजासह परतफेड करीत नाहीत तो पर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी, विजबिलाच्या मोबदल्यात दरमहा तीन टक्के रक्कम व्याजापोटी द्यायची आहे. घेतलेली पाच लाखांची रक्कम व्याजासह परतफेड केल्यानंतर घर मिळकतीचे खरेदीखत पुन्हा नावावर करुन द्यावे लागेल, त्यावेळी होणारा खरेदी खताचा खर्च देखील करावा लागेल अशा अटी शर्तीचे पत्र न्यायालयात सादर केले होते.