नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराज बागस्थित जागेवर उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत असून त्याचे औचित्य साधून या शताब्दी वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारत आहे. हा पुतळा ब्रांझ या धातूचा असून त्याची रीतसर परवानगी महाराष्ट्र शासनाच्या कला व संचालनालय विभागाने दिली आहे. जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ असा हा पुतळा राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतासह जगात मानवतावादी लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याचा सर्वांत पहिला यशस्वी प्रयत्न आहे. त्यामुळे राज्याभिषेकाची आठवण देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा हा जनतेच्या मनात मानवतावादी दृष्टिकोन जागवण्यासाठी प्रेरक ठरणार आहे.
अभ्यास व संशोधनाची संधी
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, इतिहास संशोधक, अभ्यासक व नागरिकांना प्रगत शिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी यांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व कार्यावर अभ्यास करण्याची संधी प्राप्त होईल.
जाणून घ्या पुतळ्याची वैशिष्ठे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची लांबी 20 फूट, रुंदी 15 फूट असून उंची 9 फूट आहे. सिंहासनारूढ पुतळ्याची उंची 32 फूट असून त्यावरील छत्र 7 फूट आहे. ब्रांझ धातूने बनविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे वजन 10 हजार किलोग्राम असेल. पुतळा मूर्तिकार सोनल कोहाड साकारणार आहेत.