इंदूर : मध्य प्रदेशात खरगोनहून इंदूरला जाणारी खासगी बस पुलावरून नदीत कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ऊण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दसंगा पुलावर झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
४ लाख रुपयांची नुकसान भरपाई
दरम्यान, बस पुलावरून खाली पडल्यानंतर मोठा आवाज ऐकून आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच एसपी, जिल्हाधिकारी आणि आमदारही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या अपघातील मृतांच्या नातेवाईकांना मध्य प्रदेश सरकारने ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच, जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.