पुणे : कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीमुळे वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटकामध्ये प्रचारासाठी जात आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी एका कारची झडती घेतली असता, तीन कोटी 72 लाखांची रोकड जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पुणे पोलिसांचं एक पथक सोलापूर महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी एका कारमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं समजताच पोलिसांनी कार थांबवली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित संशयित ब्रिजा कार एम एच 13 सी के 2111कारची झडती घेतली असता, पोलिसांना मोठा धक्का बसला. या कारमध्ये बॅगा मिळून आल्या. पोलिसांनी तपासल्या असता त्यात, त्यामध्ये एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये मिळून आले आहे.
संशयित व्यक्ती ताब्यात
सदरची रोख रक्कम पोलिसांनी मोजून दोन पंच समक्ष जप्त करून सीलबंद केली आहे. याप्रकरणी प्रशांत धनपाल गांधी (वय- 47 वर्षे, रा. लासूरणे ता.इंदापूर जि.पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच त्यांच्याकडील ताब्यातील वाहन जप्त करण्यात आले आहे. गांधी यांचा खत व्यवसाय, दूध व्यवसाय, किराणा दुकान व शेती व्यवसाय आहे.
आयकर विभागास दिली माहिती
याबाबत सी आर पी सी कलम 41(डी) अन्वये हडपसर पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयकर विभाग, पुणे यांना ही याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. याबाबत हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत अशी माहिती पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.