जळगाव : अवैध वाळू माफियांनी जिल्ह्यात उच्छाद मांडला असतानाच मंगळवारी अवैध वाळू वाहतूकदाराने अॅपे रीक्षाला धडक दिल्यानंतर संतप्त जमावाने दोन ट्रॅक्टर पेटवल्याची घटना तालुक्यातील आव्हाणे गावात घडली होती. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकासह नऊ संशयितांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात मंगळवारी 9 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास ट्रॅक्टर चालक सुनील अशोक पाटील हा ट्रॅक्टर (एम.एच.19 डी. 6354) मधून विनापरवाना वाळू वाहतूक करीत असताना आव्हाणे गावात अॅपे (एम.एच.19 सी.डब्ल्यू.1413) ला धडक बसल्याने रीक्षातील महिलेसह पुरूष जखमी झाल्याची घटना घडली होती. यानंतर आव्हाणे गावातील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ज्वलनशील पदार्थ टाकून दोन्ही ट्रॅक्टरला पेटवून दिले होते.
यांच्यावर गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सुनील अशोक पाटील, ट्रॅक्टर चालक रेवसिंग उर्फ राहुल वीरसिंग बारेला, जगदीश बाबूलाल ढोले, देवेंद्र दत्तात्रय पाटील, किरण पांडुरंग ढोले, काशिनाथ शिवाजी ढोले, सय्यद इकबाल सय्यद गफार आणि शेख रऊफ शेख युसुफ (सर्व रा.आव्हाणे) यांच्या विरोधात गैरकायद्याने मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघण करून ट्रॅक्टर पेटवून दिल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.