मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज निकाल लागला. कोर्टाच्या निकालामुळे शिंदे- फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर भाजप शिंदे गटाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, आमच्यासोबत निवडून आले. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं, त्यावेळी उद्धव ठाकरेनी नैतिकता कुठल्या डब्ब्यात बंद करुन ठेवली होती? अशा शब्दात फडणवीस यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे सांगितले. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करतो. निश्चितपण लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “हा जो काही निकाल आहे, त्यात चार-पाच महत्वाचे मुद्दे आहेत, त्याकडे लक्ष वेधू इच्छितो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चपराक- मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीत अपेक्षित निकाल लागला, सत्याचा विजय झाला. आम्ही कायदेशीर बाबींची पूर्तता करुन सरकार स्थापन केलं. आज सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चपराक लगावली आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला आहे. सर्वोच्च न्यायालायच्या निर्णयाच मनापासून स्वागत करतो.
उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड- उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आजच्या निर्णयाने सत्तेसासाठी हपापलेल्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड झाली आहे. मला ज्यांनी दगा दिला. त्यांनी धोका दिला. अशा विश्वासघातकी लोकांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणावा आणि आम्ही त्याला सामोरे जावं हे माझ्या रक्तात बसणारं नव्हतं. त्यामुळे मी अविश्वास ठरावाला सामोरे गेलो नाही. मी राजकीय नैतिकता म्हणून पदाचा राजीनामा दिला होता. आता तेवढीच नैतिकता शिल्लक असेल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.