कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल बॅलेटची मतमोजणी अजूनही सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. तर भाजप 81 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस 21 वर आघाडीवर आहे. 10 मे रोजी कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान झाले होते. सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असतानाच, काँग्रेस भाजपला सत्तेतून हुसकावून लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. राज्यात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत JD(S) पुन्हा एकदा किंगमेकर होण्याची आशा करत आहे.
राज्यात बहुमतासाठी 113 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजप 81 आणि जेडीएस 21 जागांवर आघाडीवर आहे. इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. कल हाती येताच काँग्रेसने ट्विट करून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. कर्नाटकात काँग्रेसचा विजय रथ कोणी रोखू शकत नाही, असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि केंद्रीय मंत्र्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. कर्नाटकात पुन्हा सत्ता आणण्यासाठी या नेत्यांनी कंबर कसली होती. पंतप्रधान मोदी यांनी तर बजरंग बलीचा नाराही दिला होता. मात्र, असं असतानाही कर्नाटकात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. दक्षिणेकडील फक्त कर्नाटक राज्यातच भाजपचं सरकार आहे. या राज्यातून सत्ता गेली तर भाजपचं दक्षिण भारतातून उच्चाटन होईल असं चित्र आहे.