जळगाव : सध्याच्या काळात लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यातल्या त्यात शेतकरी मुलास तर मुलगी मिळणे कठिणच झाले आहे. लग्नासाठी सरकारी नोकरी किंवा गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या तरुणालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आता शेतकरी तरुणांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शेतकरी तरुणाने याच मनस्तापातून अनोखे आंदोलन केले आहे. त्याची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील तरुण शेतकरी पंकज राजेंद्र महाले याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन डोक्यावर टोपी, पांढरा गणवेश व कपाळी मुंडावळ्या बांधत आला व त्याने ‘बागायतदार आहे बागायतदारीण हवी’ असा फलक हातात घेऊन उंचावत अनोखे आंदोलन केले. याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.
नोकरीअभावी मुलगी मिळेना
पंकज महाले याची नाचनखेडा गावात शेती असून तो एकटा 10 एकर बागायती शेतीचा मालक आहे. त्याचे बीएस्सी ॲग्रीचे उच्च शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, नोकरी नसल्याने पंकज हा बेरोजगार आहे. 10एकर बागायती शेती आणि उच्च शिक्षित असून सुद्धा केवळ नोकरी नसल्याने लग्नासाठी पंकजला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. या मनस्तापातून त्याने अनोखे आंदोलन करुन समाजातील या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधून घेतले आहे.