जळगाव: जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रावेर येथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. नम्रता दिनेश चौधरी (वय-३९) असे मृत महिलेचे नाव आहे.
रावेर शहरातील केबल व्यावसायिक असलेले दिनेश नथ्थू चौधरी हे त्यांच्या पत्नी नम्रता चौधरीसह मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण येथे संत मुक्ताबाईच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर दोघं तिथून जवळ असलेल्या वरणगाव येथे माहेरात गेले. या ठिकाणी त्यांना त्रास जाणवू लागला, चक्कर, उलटी आल्याने तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रावेरमध्ये आज ४५.७ डिग्री एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.