जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील निवृत्तीनगरातील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेमंत राजेंद्र चौधरी (वय-३४) रा. निवृत्ती नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. हेमंत चौधरी हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह निवृत्ती नगरात वास्तव्याला होते. पेंटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी १२ मे रोजी रात्री हेमंत चौधरी हे जेवण करून झोपले होते. मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना त्यांनी दोरीच्या सहाय्याने किचनमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी १३ मे रोजी सकाळी ५ वाजता पत्नी गायत्री यांच्या लक्षात आल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.
अकस्मात मृत्यूची नोंद
नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी गायत्री, मुलगा प्रतिक आणि मुलगी माही, आई मंगला, भाऊ विनोद आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.