मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजपच्या ताब्यातून सत्ता काँग्रेसनं हिसकावून घेतली आहे. कर्नाटकात भाजपच्या पराभवामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालानंतर आता महाविकास आघाडीत घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही भाजपसमोर विरोधकांचा जोर वाढणार आहे.
कर्नाटकात भाजपच्या पराभवामुळे विरोधी पक्षांमध्ये बळ संचारले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील नेते सर्व मतभेद बाजूला सारुन एकजुटीने पुढे जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.
एकत्र बसून योजना आखायला हवी- शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन केलं. तसंच महाराष्ट्रातील लोकांनाही आता बदल हवा असल्याचं ते म्हणाले. “मी महाराष्ट्रात आमच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. मी उद्धव ठाकरेंची भेट घेईन आणि यावर चर्चा करेन. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, आम्हाला एकत्र बसून पुढील योजना आखायला हवी. मी याबद्दल सर्वांशी चर्चा करेन,” असं शरद पवार म्हणाले. मोदी है तो मुमकिन है या विचारांना लोकांनी नाकारलं आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही आता बदल हवे आहेत. आम्ही वेगवेगळं लढण्याचा प्रश्न नाही. आता तिन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि छोट्या पक्षांना भरवला दिला पाहिजे. परंतु आपण हा निर्णय एकटे घेणार नसून, सर्व सहकाऱ्यांसोबत यावर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
…तर राज्यातही बदल शक्य
मी महाराष्ट्रात हल्लीच काही ठिकाणी गेलो. सोलापूर, सांगोला, कागल, साताऱ्याला गेलो. या सगळ्या भागात मागच्या निवडणुकीच्या वेळी मी जसा प्रचाराला बाहेर पडलो आणि माझी ती पावसातली सभा वगैरेला जो प्रचंड प्रतिसाद होता, तेच चित्र गेल्या आठवड्यात मी ज्या सहा ठिकाणी गेलो, तिथे दिसलं. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की लोकांना इथेही बदल हवाय. ते पुढच्या निवडणुकीत दिसेल. आम्ही तिघं एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर ते घडताना दिसत आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.