जळगाव: जिल्हाभरातील अधिकारी शासकीय दालनात बेकायदा एसीचा वापर करीत आहेत. त्याविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी शासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार काही अधिकाऱ्यांनी आपल्या दालनातील एसी काढून घेतले आहे. जिल्ह्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढला असताना आता एसी नसल्यामुळे अधिकाऱ्यांचा घाम निघत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच जळगावात येऊन गेले. यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली. कोण आहे ती व्यक्ती? तर गुलाबरावांनी देखील या प्रकरणावर हतबलता दर्शविल्याचे समजते. पालकमंत्री देखील या विषयावर तोडगा काढू शकले नाही. त्यामुळे हे प्रकरण जेव्हा सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी हा विषय माझ्याकडे मांडू नका, आपल्या पातळीवर सोडवा असे सांगितले.
काय आहे प्रकरण?
जिल्हा पातळीवर एकही अधिकारी दालनात एसी बसवू शकत नाही. त्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह सर्वच यंत्रणांचा समावेश आहे. या संदर्भात गुप्ता यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यावर राज्य शासनाने अधिकाऱ्यांनी दालनातील एसी काढून घ्यावेत असे आदेश काढले. त्यावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हाधिकारी कार्यालयासह काही अधिकाऱ्यांनी एसी काढून घेतले आहेत. त्यामुळे आता वाढत्या तापमानात अधिकाऱ्यांना काम करणे कठिण होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.