जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन बसस्थानकासमोर सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीने सीएसआर निधीतून स्वच्छतागृह उभारण्याची तयारी सुरू केली आहे. आज महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीने काही दिवसांपूर्वी सागर पार्कवरील सुशोभीकरणाचे काम त्यांच्या सीएसआर निधीतून केले आहे. यानंतर त्या कंपनीने नवीन बसस्थानकासमोर स्वच्छतागृह बांधावे असे मनपा प्रशासनाने त्यांना सूचित केले होते. याप्रसंगी आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, ऍड. सुचिता हाडा, नगरसेवक अनंत जोशी, सचिन पाटील, सुप्रीमचे सीनियर जनरल मॅनेजर प्रभूदेसाई आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी या स्वच्छतागृहाच्या माध्यमातून महिला व पुरुषांची सोय होणार असल्याचे तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतागृहाची करण्यात येणारी मागणी त्यातून पूर्ण होत असल्याचे सांगितले.