अमळनेर: भल्या पहाटे आपल्या पतीसोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेस चाकूचा धाक दाखवुन तिची 15 ग्रॅम सोन्याची पोत ओरबडून नेल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास आर के नगर जवळ घडली. सदर चोरटे चारचाकी वाहनातून आले होते, लूट झाल्यानंतर धुळ्याकडे ते पसार झाले. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ माजली असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.
याबाबत अधिक असे की स्वामी समर्थ मंदिराजवळ राहणारे दीपक मेडिकलचे मालक रामलाल बाबूलाल पाटील हे आपल्या पत्नी रंजनाबाई रामलाल पाटील यांच्यासोबत दररोज पहाटे धुळे रस्त्यावर नियमित पायी फिरायला जात असतात. दि 14 रोजी नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता ते दोघेही फिरायला निघाले होते. पहाटेची वेळ असल्याने रस्ता निर्मनुष्य होता. आर के नगर जवळ ते पोहोचले असता समोरून येणारी एम एच 09 एकयु 1559, सिल्व्हर रंगांची वॅगनार गाडी अचानक त्यांचा जवळ थांबली. त्यातून तोंडाला रुमाल बांधलेले चार जण खाली उतरले. हा प्रकार पाहून पतीपत्नी कमालीचे घाबरले होते. त्या चौघांपैकी एकाने चाकू काढून महिलेला धाक दाखवीत त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची पोत कोणत्यातरी लहान हत्याराने एका सेकंदांत ओरबडली. यामुळे महिलेच्या मानेला थोडी जखमही झाली. यानंतर ते चोरटे पटकन वाहनात बसून धुळ्याकडे पसार झाले. चोरट्यांकडे इतर हत्यारे देखील असल्याने नक्कीच ते मोठे दरोडेखोर असावे अशी खात्री त्यांची झाली होती.
पोलीस ठाण्यात तक्रार
या घटनेने पतीपत्नी घाबरले असल्याने त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूला कुणीही नसल्याने ते हतबल होते. हा प्रकार सुरू असताना तेथे शेजारीच राहणारे माजी नगरसेवक राजेश पाटील यांना थोडा आवाज झाल्याने ते तेथे पोहोचले होते. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दुसरीकडे घाबरलेले पत्नीपत्नी पळतपळत गावाकडे आले त्यानंतर मुलाला सोबत घेत पहाटे 6 वाजताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठत ऑनलाइन तक्रार दाखल केली.
मानसी ज्वेलरीवर लूट करणारेच हेच ते आरोपी
शहरात दोन दिवसांपूर्वी चोरट्यानी पिंपळे रोडवरून वॅगनार गाडी चोरी करून मुंदडा पार्क जवळील मानसी गिफ्ट्स अँड ज्वेलरी हे शॉप फोडून लाखांचा माल लंपास केला होता. सदर चोरटे व ती गाडी सीसीटीव्ही कॅमरे व एका व्हिडीओ मध्ये कैद झाले होते. त्यानंतर कालच्या लुटीच्या घटनेनंतर काही सीसीटीव्ही तपासले असता तीच गाडी व तेच चोरटे दिसत असल्याने त्यांनीच ही लूट केल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस यंत्रणेला कामाला लावले आहे.
पोलिसांचे एक पथक धुळ्याकडे रवाना
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलिसांचे एक पथक धुळे येथे रवाना केले असून तेथे गोपनीय माहिती घेऊन विविध ठिकाणी शोध घेतला जात आहे. सदर आरोपींनी चोपडा येथेही याच रात्री लूट केल्याची माहिती मिळाली आहे,दुहेरी गुन्ह्यामुळे सदर चोरटे पोलिसांसाठी आव्हानच ठरले आहेत.