पुणे : राज्यभरात तापमानाचा पारा वाढला असून, उन्हाच्या तीव्र झळा बसत आहे. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असून, अशा वातावरणात नदी- तलावांमध्ये पोहण्याचा आनंद लुटत आहे. मात्र पुणे आणि चंद्रपुरात पोहण्याचा मोह अंगलट आला आहे. खडकवासला धरणात नऊ मुली बुडाल्या. यातील सात मुलींना वाचविण्यात यश मिळाले असून, दोन मुलींचा मृत्यू झाला. तर चंद्रपुरातही चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खडकवासला धरणाच्या पाण्यात गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
दोन मुलींना वाचविण्यात यश
गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी 9 मुली उतरल्या होत्या. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास या मुली पाण्यामध्ये उतरल्या. पण पाण्याचा अंदाज न आल्याने या सर्व मुली पाण्यामध्ये बुडू लागल्या. धरणाच्या काठाजवळ दशक्रिया विधीसाठी आलेल्या काहींना या मुली बुडत असल्याचे दिसले. त्यानंतर या लोकांनी धरणामध्ये उडी मारत 9 पैकी 7 मुलींना सुखरुप बाहेर काढले. तर दोन मुलींचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. या सर्व मुलींचे अंदाजे वय 16 ते 17 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. धरणामध्ये बुडालेल्या दोन मुलींचे मृतदेह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे.
चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मोनू त्रिलोक शर्मा (वय 26), प्रफुल विठ्ठल येलुरे (वय 20), शुभम रुपचंद लांजेवार (वय 24), महेश मधुकर घोंगडे (वय 20) सर्व रा. कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी असे मृत तरुणांची नावे आहेत.